शरद पवारांच्या सल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना आजोबांची पुस्तके पाठवणार!

पुणे : पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं- साहित्य पाठवणार आहेत . राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच साहित्य वाचावं आणि तसा वैचारिक वारसा जपावा, असा सल्लाही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेड पोस्टानं प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं राज ठाकरेंना पाठवणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याशिवाय राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखणात दंतकथा नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद अधिक वाढला  आहे. या विषयाबद्दल बोलताना, राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.

शरद पवारांनीच्या सल्ल्यानुसार संभाजी ब्रिगेडने थेट कृती करण्यास सुरुवात केली आहे. आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं कुरिअर करणार आहेत. 

राज ठाकरेंवर संभाजी ब्रिगेडतर्फे टीका 

राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

दरम्यान, हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडलं होत.