मीडिया,शिक्षण आणि चित्रपट क्षेत्र असा प्रेरणादायी प्रवास : दैवता चव्हाण-पाटील

यंग महाराष्ट्र प्रतिनिधी/रेणू भोसले

दैवता पाटील… लोकप्रिय होण्याआधी हे एक विद्यार्थी – प्रिय नाव..!! मुंबई विद्यापीठातील पत्रकारिता विभागाच्या त्या प्राध्यापिका. शिक्षण क्षेत्रातला दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या दैवता पाटील यांनी आता चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आजचं अध्यापन क्षेत्र जर पाहिलं तर या क्षेत्रातील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत.आणि माध्यम क्षेत्राशी निगडित जेव्हा तुम्ही अध्यापन करत असता तेव्हा आव्हाने ही निरनिराळ्या प्रकारची.!! त्याचबरोबर आजच्या चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवणे हे मोठे धाडसाचे पाऊल… धाडसाचे यासाठी म्हणावे कारण चित्रपट क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी आणि त्या क्षेत्राशी संबंधित कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात उतरणे हे आजच्या युगात एक मोठे पाऊल मानले जाते. आयुष्याची एक दिशा ठरवून एक स्पष्ट चौकट तयार करून ठेवणे आणि त्या चौकटीशी आयुष्यभर प्रामाणिक राहून तोच वारसा पुढे चालवणाऱ्या तथाकथित मध्यमवर्गीय मराठी समाजात जर कोणी ‘वेगळी वाट’ निवडली तर ते कौतुकास्पदच ठरते.फक्त यासाठी गरज असते ती म्हणजे निर्णय क्षमतेची.

दैवता पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून चित्रपट निर्मितीचं शिवधनुष्य स्वीकारून, आपल्या निर्णय क्षमतेची एक ओळख करून दिली आहे.२०१८ साली प्रदर्शित झालेला, बारायण हा चित्रपट दिग्दर्शक दिपक पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांचा देखील हा पहिलाच चित्रपट. मग अशातच त्यांच्या पत्नी दैवता पाटील यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. बारायण चित्रपटात समाजव्यवस्थेचा आणि कुटुंबव्यवस्थेचा परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर कसा होतो हे दाखवण्यात आले आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या शिक्षणासंबंधीच्या आणि करिअर संबंधीच्या सामाजिक मनोवृत्तीत आपल्याला फरक आजही दिसून येत नाही मग यावरच भाष्य करणारा हा सिनेमा.या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी दैवता पाटील यांनी पेलली ती ही याआधी चित्रपट क्षेत्रातला कुठलाच अनुभव नसताना. शिक्षण क्षेत्राशी निगडित असताना, शिक्षण आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती इथे एक सहसंबंध दिसून येतो.चित्रपटनिर्मिती करत असताना जेव्हा कोणतीही पार्श्वभूमी नसते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टी पर्यंत आर्थिक बाबींचा आणि इतर बाबींचा चांगलाच अभ्यास असावा लागतो.

चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आधी दोन वर्षे निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास केला.याआधी त्यांना जाहिरात निर्मितीचा अनुभव होता. तरी चित्रपट निर्मिती ही तुलनेने व्यापक प्रक्रिया असल्यामुळे या क्षेत्राशी निगडित अभ्यास करूनच त्या निर्मात्या म्हणून उतरल्या. प्राध्यापिका म्हणून मुंबई विद्यापीठात कार्यरत असताना, चित्रपट निर्मिती करताना त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यावेळचे विभागप्रमुख डॉ.संजय रानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्या सांगतात. चित्रपट निर्मितीसाठी दैवता पाटील आणि दिपक पाटील यांनी ‘ओंजळ आर्ट्स प्रॉडकशन्स’ ची निर्मिती केली आहे. याद्वारे भविष्यात अनेक चित्रपट, लघुपट आणि नवीन संकल्पनांसहित ते आपल्या भेटीला येतायत.

सध्या शिक्षण आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि भविष्याच्या दृष्टीनेही चित्रपट क्षेत्राकडे आपली वाटचाल निश्चित करणाऱ्या दैवता पाटील यांना माध्यम क्षेत्राशी निगडित क्षेत्रांमध्ये कामांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पब्लिक रिलेशन, अ‍ॅडव्हर्टायझिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन या क्षेत्रांचा त्यांना अनुभव आहे. मीडिया इंडस्ट्री मध्ये एकाचं क्षेत्राचा अनुभव पुरेसा असतं नाही. एका क्षेत्रात कार्यरत असताना इतर माध्यम क्षेत्रांची चांगली माहिती असावी लागते. त्यातही पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना ‘प्रॅक्टिकल नॉलेजची’ चांगलीच कसोटी लागते. त्यांचे अनेक विषयांवरील शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. दैवता पाटील यांचा विविध क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना नेहमीच उपयोगी पडतो. कारण मीडिया मॅनेजमेंटसाठी शिकवल्या जाणार्‍या गोष्टी या अनुभवावरून स्पष्ट कराव्या लागतात. त्यामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा विद्यार्थ्यांच्या नेहमीच उपयोगी पडतो.

क्षेत्र कोणतंही असो जिथे महिला काम करतात, त्या ठिकाणी एखादा बदल नक्कीच दिसून येतो. शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, पोलिस यंत्रणा या साऱ्या क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने काम केले असे नाही तर स्त्रियांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात स्वतःचा एक ‘नावीन्यपूर्ण ठसा’ उमटवला आहे. सर्व क्षेत्रात महिलांची एक वेगळी गरज दिसून येते. मग चित्रपट क्षेत्रसुद्धा त्यात आलं. एक स्त्री निर्मात्या म्हणून त्यांनी सेटवर शिस्त कायम राहील याची दक्षता घेतली आणि शूटिंगसाठी त्याच शिस्तीतून अत्यंत अनुकूल वातावरण त्यांनी निर्माण केलं. याचाच परिणाम म्हणून ठरलेल्या वेळापत्रकानुसार आधी दोन दिवसातच त्यांनी शूट संपवलं. स्त्रियांमध्ये विविध प्रकारची कामे एकाच वेळी करण्याचे कौशल्य असल्यामुळे त्यांच्यात नियोजनबद्धता असते, इथे दैवता पाटील यांचे नियोजनाचे कौशल्य दिसून येते.

दैवता पाटील यांच्या प्रवासाची कहाणी उलगडताना सुरुवातीच्या काळात मास्टर्स करत असतानाच, त्या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या आणि अचानकच त्यांना पुणे विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करण्याची संधी चालून आली. पण आपला कल मीडिया, व अ‍ॅडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे असणाऱ्या दैवता पाटील या आज एक अध्यापिका म्हणून देखील समाधानी आहेत. त्यांच्या अध्यापनाचा, मार्गदर्शनाचा, मोटिवेशनचा आणि त्यांच्या सहवासाचा देखील अनेक विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला आहे. मुंबई विद्यापीठात त्यांचा अध्यापनाचा अनुभव १२ वर्षे असून अनेक विद्यार्थ्यांच्या आज त्या एक आदर्श आहेत. दैवता पाटील यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्या विद्यार्थ्यांकडून….

नितीन बिनेकर,

एम.ए. पीआर. करण्यासाठी नागपूरवरून प्रथमच मी मुंबईत आलो होतो. ऍडमिशन शुल्क 25 हजार रुपये सेमिस्टर होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र मला जॉब करून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. कॉलेजला गैरहजर राहता येत नव्हतं. त्याच दरम्यान योगायोगानं मला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात टाटा फेलोशिप मिळाली. नंतर कॉलेजला जाणं शक्य नव्हतं. मात्र मॅडमांना माझ्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी मला धीर देत नेहमी सहकार्य केलं. एक गोष्ट मॅडम विषयी आवर्जून सांगू इच्छितो, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक शिक्षिका आल्या.. प्रत्येकाकडून काहीं ना काही शिकता आले. मात्र मॅडमकडून आजच्या पत्रकारिता क्षेत्रातील स्पर्धेत टिकायचे कसे हे शिकता आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुंबईत मला हिंदी आणि नंतर मराठी पत्रकारितेत काम करता आले. आताही काही अडचण आली तर मॅडम आम्हाला मार्गदर्शन करत असतात.

– नितीन बिनेकर,
(Master’s in public relation 2017. सध्या आपलं महानगर या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून कार्यरत)

क्रिस एम,

दैवता पाटील या उत्तम शिक्षिका आहेत. एक प्रसंग आठवतो, लेक्चर दरम्यान मला ब्लॅक बोर्ड जवळ जायला सांगितले होते त्या दरम्यान मी चालताना चुकून घसरलो आणि घसरल्यावर मॅमच्या डोक्यावर आदळल्यामुळे त्यांना खूप लागले होते. ती वेदना त्यांच्या डोळ्यातून दिसून येत होती पण तरीपण त्यांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही आणि त्यानंतर त्यांनी लेक्चर कंटिन्यू केले. आयुष्यात नेहमीच मला दैवता पाटील यांसारख्या दिशादर्शकाची गरज आहे. अध्यापनाविषयीचे त्यांचे प्रेम आणि दृढनिश्चय दिसून येतो. ‘Good teachers teach, Great teachers transform’. ही उक्ती दैवता पाटील यांना लागू होते.

( क्रिस एम, MA PR)

सिध्दी बोबडे,

प्रचंड हुशार, नेतृत्व गुण असलेल्या, टापटीप आणि साड्यांची आवड असणाऱ्या. परखड मतं मांडणाऱ्या मेहनती,उत्साही, तुम्हाला निराश होवू न देता घरातल्या व्यक्ती प्रमाणे प्रोत्साहन देणाऱ्या. मैत्रिणीप्रमाणे समजून. घेणाऱ्या हळव्या प्रसंगी कठोर,कणखर अशा आहेत त्या. विद्यार्थ्यांची खास करून मुलींची विशेष काळजी घेणाऱ्या “एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो आमच्या वेळी सरगम नावाचा कोजागिरीला कार्यक्रम असायचा तेव्हा मॅमनी सगळी तयारी नीट होतेय की नाही पाहिलं. इतकंच नाही तर मुलींना तयारी करायला सुद्धा मदत केली.” शिस्त प्रिय आणि कडक स्वभावाच्या आपण म्हणू शकतो आणि ही शिस्त किंवा कडक स्वभाव त्यांच्या कामात असलेल्या परफेक्शन मूळे आला असावा. बाकी अभ्यास, असाईंमेंट वेळेवर आणि परफेक्टचं हवं असणाऱ्या..चुकलं की ऐकुन घेण्याची तयारी ठेवायला तयार राहायचं. आपण अभ्यास काम नीट केलं की कौतुकाची थाप नकळत मिळते ह्या सर्वांकडून. कळत नकळत त्यांच्या सहवासानेच त्या तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातात त्या शिका. आणि हो काम किंवा गोष्टी अगदी परफेक्ट हव्या त्यात दिरंगाई किंवा अजागळपणा चालत नाही. आदरयुक्त भीती तेव्हा ही होती मॅम विषयी आणि आता ही आहे.

– सिद्धी बोबडे
(Master’s in Electronics Media Student Of DCJ 2017 )

आकाश लाल,

जर विद्यार्थी हा बाण असेल तर शिक्षक हा एक धनुष्य असतो जो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देतो. दैवता पाटील माझ्या आयुष्यात अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांच्याकडून मी सल्ले घेतो. मी खूप भाग्यवान आहे की दैवता पाटील यांच्यासारख्या गुरूंचा मला सहवास लाभला.

( आकाश लाल , युट्युबर आणि दिग्दर्शक)