नेतृत्व,दातृत्व आणि मातृत्व यांची ‘भागीरथी’ : अरुंधती महाडिक

कोल्हापूर/रेणू भोसले

‘खंबीर नेतृत्व’, ‘निःस्वार्थी दातृत्व’ आणि ‘उत्तम मातृत्व’ यांच्या त्रिवेणी संगमातून जर ‘कुशल कर्तृत्व’ उदयास येत असेल तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरुंधती महाडिक… ‘भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापिका’, अरुंधती महाडिक यांच्या महिलांसाठीच्या कार्याचा आढावा घ्यायचा झालं तर अगदी किशोरवयीन मुलींपासून तर वयोवृद्ध स्त्रियापर्यंत असा त्यांनी आपल्या कामाविषयीचा दृष्टिकोन व्यापक ठेवला आहे.भागीरथी महिला संस्था आणि भागीरथी युवती मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्त्रियांना एक मंच मिळवून दिला आहे. त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास एक ‘उत्तम गृहिणी ते एक उत्तम सामाजिक कार्यकर्त्या’ असा आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांचे पती माजी खासदार, संसदरत्न धनंजय महाडिक यांची समर्थ साथ त्यांना लाभली. अरुंधती महाडिक यांच्या कार्याला ते पाठबळ देतात तसेच समाजकार्यासंबंधीच्या सौ. महाडिक यांच्या निर्णयांना पाठींबा देतात आणि निर्णयस्वातंत्र्यही देतात. त्यामुळे आपल्या समाजकार्याचं श्रेय हे त्या मा. खासदार धनंजय महाडिक यांना देतात. भागीरथी महिला संस्थेच्या समाजकार्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पाठिंबा असतो.

अरुंधती महाडिक यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले हे त्यांच्या 25 वर्षे सरपंच असलेल्या आजोबांकडून ( नाईक – निंबाळकर, सातारा) लहानपणापासूनच त्यांना अजोबांमुळे समाजकार्य जवळून पहायला मिळालं. आपली कौटुंबिक जबाबदारी उत्तमपणे सांभाळून अरुंधती महाडिक यांनी आपला समाजकार्यात वेगळा ठसा उमटवला आहे. हे सेवेचं व्रत त्यांनी स्वीकारलं साधारण २००४ पासून तेव्हापासून आजपर्यंत त्या अविरतपणे कार्यरत आहे.

महिला सबलीकरणातील महत्वाचा घटक म्हणजे महिलांचे स्वावलंबन!! महिलांच्या स्वावलंबनासाठी अरुंधती महाडिक या विशेष प्रयत्नशील आहेत. भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंचच्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगारासाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. केवळ फक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे.. इथवर हे थांबत नाही तर त्याची अंमलबजावणी कशी होते आणि यामुळे महिलांना कितपत फायदा होतो यावर त्या जातीने लक्ष घालत असतात.


महिलांसाठी विविध प्रकारची मोफत प्रशिक्षणे त्या आयोजित करतात. यामध्ये कुकिंग, फॅशन डिझायनिंग, वाॅशिंग पावडर, साबण, नीळ, फिनेल यांसारख्या गृहोपयोगी वस्तू बनवणे अशा प्रकारचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाते. एवढंच नव्हे तर त्या स्वतः वैयक्तिक पातळीवर त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या वस्तूंचा खरेदी करून वापर देखील करतात. शिवाय महिलांच्या लघु-उद्योग आणि कुटिरोद्योगांसाठी त्यांचे आर्थिक सहाय्य देखील असते. ग्रामीण भागातील निरक्षर, निराधार, महिलांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शेळी पालन साखळी प्रकल्पही सुरू केला आहे.

‘बचत गट’ या संकल्पनेला अरुंधती महाडिक यांनी एक नवीन ‘आकार दिला’ आहे. केवळ महिलांनी एकत्र येऊन उत्पादन बनवणे आणि ते आपल्या गावपातळीवर विकणे या परंपरेला फाटा देत त्यांनी, महिलांना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य देणे, उत्पादन निर्मिती दरम्यान तिथे स्वतः उपस्थित राहणे आणि तयार झालेल्या उत्पादनासाठी मार्केटिंगची सोय करणे, ऑनलाईन विक्रीस प्रोत्साहन, उद्योगाचे रजिस्ट्रेशन, उद्योगासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देणे आणि विक्री ही केवळ एका शहरापूरती मर्यादित न ठेवता अगदी परदेशातही उत्पादन पोहोचेल याची सोय त्यांनी केली आहे. तसेच कोरोनामुळे उद्भवलेल्या संकट काळात त्यांनी आर्थिक स्वरूपात अनेक कुटुंबांना आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच अनेक कुटुंबांना अन्नपुरवठा करण्याचे कार्य ही केले आहे.


किशोरवयीन मुली, त्यांचे वाढते वय, आरोग्य आणि शिक्षण अशा विषयांचे भान ठेऊन त्या किशोरवयीन मुलींसाठी व्याख्याने आणि विविध उपक्रम आयोजित करतात. सध्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाढत्या वयानुसार किशोरवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांना देखील सामोरे जावे लागते त्यामुळे काळाची गरज ओळखून त्या ‘कळी उमलताना’, या व्याख्यानमालेचे आयोजन करतात. आरोग्य उपक्रमांचेही आयोजन त्या करत असतात.

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेची जोपासना करत त्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘झिम्मा – फुगडी’ स्पर्धा आयोजित करतात यात कोल्हापुरातून आणि कोल्हापूर बाहेरूनही हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध स्त्रिया यात सामील होतात. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक स्पर्धा नव्हे तर झिम्मा – फुगडी, उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपरिक खेळ यांचा एक संमिश्र सोहळा असतो आणि शहर आणि खेडोपाड्यातून यात सामील झालेल्या स्त्रियांना मनमुराद आनंद लुटता येतो. आकाशात कितीही उंच झेप घेतली तरी जेव्हा नाळ ही परंपरेशी जुळलेली असते तेव्हा त्या ‘व्यक्तीची पावलं’ ही ‘जमिनीवर’ असतात…

अरुंधती महाडिक यांचे ‘सामाजिक कार्य’ त्याचबरोबर ‘सामाजिक जाणीव’ देखील लक्ष वेधून घेते. याचे कारण म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रातील तसेच संपर्कातील लोकांशी औपचारिकतेच्याही पलीकडे जाऊन त्या घट्ट नाते विणतात. अरुंधती महाडिक यांचे नेतृत्व हे फक्त मार्गदर्शनापूर्ते मर्यादित नसून महिलांमध्ये सामील होऊन त्यांच्यासोबत त्या कार्याचा अनुभव घेणाऱ्यातले आहे. भागीरथी महिला संस्था असेल, बचत गटातील महिला, त्यात नव्याने सामील होणाऱ्या महिला यांच्याशी त्या मायेने आणि आपुलकीने संवाद साधतात, उद्योगशीलतेचं महत्व त्यांना पटवून देतात. महिलांशी असलेल्या या आपुलकीमुळे आणि ‘अंतर’ न ठेवता वागण्यामुळे महिलांच्या ‘अंतरात’ त्यांचे एक वेगळे स्थान बनले आहे….

‘ भागीरथी महिला संस्थेचे कार्य’ हे सतत, अविरत वाहणाऱ्या ‘भागीरथी’ अर्थात गंगेच्या प्रवाहाप्रमाणे..’अविरत’ आणि वाहताना अनेक जनजीवन फुलवणारे आहे…

भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापिका अरुंधती महाडिक यांच्या कार्याला यंग महाराष्ट्रचा सलाम..