सांस्कृतिक गुलामगिरी

‘विधवा’ हा स्त्रियांसाठी वापरला जाणारा शब्द जसा समाजामध्ये प्रचलित आहे तसा पुरुषांसाठी वापरला जाणार ‘विधुर’ हा शब्द प्रचलित नाही, क्वचितच कधी हा शब्द कानावर येतो.

स्त्री म्हणून तिचा केला जाणारा सन्मान हा तीचा सन्मान नसतोच तर स्त्रीला पती आहे आणि तो पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच तीचा सन्मान केला जातो. तोपर्यंतच तिला कुंकू, टिकली, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या,जोडवी हा शृंगार करण्याचा अधिकार असतो.

स्त्रीला तिची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तिचा पती जिवंत असणं आणि तिला मूल असणं ह्या अटी आहेत. परंतु पुरुषाला त्याची प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी असल्या कुठल्याच अटी नाही.असं म्हटलं जातं. स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी हळद कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. पण त्या कार्यक्रमात विधवा आणि मूल नसलेल्या विवाहित स्त्रीला शून्य किंमत असते.

भारतात स्त्रियांवर टाकण्यात आलेल्या बंधनांमुळेच जातीव्यवस्था उदयास आली. आपल्या समूहातील मुलगी दुसऱ्या समूहात जाणार नाही याची काळजी घेतली गेली, पतीच्या निधनानंतर तीचं केशवपन, सतीप्रथा हे ह्याच गोष्टीचं बाय प्रॉडक्ट आहे. वटपौर्णिमा चा अर्थ ही काहीसा असाच होतो की मला सात जन्मी ह्याच जातीत हा नवरा मिळू दे. ह्याचं अनुकरण इतर समूहात झाल्याने जाती निर्माण झाल्या. त्यामुळे जातीव्यवस्था उध्वस्त करण्यासाठी स्त्रियांना पूर्णपणे स्वतंत्र करणे आवश्यक आहे.

या सर्व गोष्टींना धर्माचा आधार नाही असं कोणी म्हणू शकेल का? ही सर्व स्त्रिविरोधी कृत्यं कुठे आणि कशासाठी जन्मास आली हे जर स्त्रियांना समजले तर परिवर्तनाची सुरुवात तरी होईल अशी आशा आहे. स्त्रियांना जे काही आपण आता चांगल्या स्थितीत बघतोय ते सर्व फुले दांपत्याचे संघर्षमय योगदान आणि बाबासाहेबांनी दिलेले संविधान यांमुळेच होय!

धर्माचा टेंभा मिरवणाऱ्यांना यावर कधीच भाष्य करू वाटणार नाही. उलट स्त्रियांची सांस्कृतिक व धार्मिक गूलामगिरी कायम करण्यासाठी धर्ममार्तंड आणि त्यांची भक्तांची फौज अहोरात्र कष्ट घेत आहेत!

~ विशाल काळे