चाळीसगावात बाबासाहेबांच्या अस्थी, भीम अनुयायी गहिवरले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खान्देशातील चाळीसगावशी अतूट नाते राहिले आहे. त्यांच्या पवित्र चरणरजाने चाळीसगावची माती धन्य झाली. या ठिकाणी २२ जुलै २०२१ रोजी खोदकाम करताना पुतळ्याखाली बाबासाहेबांचे दोन अस्थिकलश सापडले. अस्थिकलशाच्या रूपाने महामानवाच्या गतकालीन अविस्मरणीय आठवणींना एकप्रकारे नवी ऊर्जा मिळाली आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावशी अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. १९२७ ते १९५१ च्या दरम्यान बाबासाहेबांनी चाळीसगावला पाचवेळा भेट दिल्याचा उल्लेख सापडतो. माजी कायदेमंत्री हरिभाऊ पाटसकर यांच्या आग्रहास्तव बाबासाहेब १९२७ साली पहिल्यांदा चाळीसगावला आले होते. बाबासाहेबांची प्रेरणा, आदर्श व सहभागाने दिवाण चव्हाण, अॅड. डी. आर. झाल्टे, डी.डी. चव्हाण, भगवान बागल गुरुजी, यशवंत जाधव, पुंडलिक वाघ, सखाराम मोरे यांनी दोस्त थिएटरजवळ ‘दीनबंधू आंबेडकर आश्रम’ संस्था स्थापन केली. संस्थेच्या वसतिगृहात अनेक अस्पृश्य विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती.

चाळीसगावात सापडलेला बाबासाहेबांचा अस्थिकलश

आश्रमशाळेसमोर बाबासाहेबांची मोठी जंगी जाहीर सभा झाली होती. १९२७ ते १९३८ या काळात बाबासाहेबांनी या संस्थेला अनेकवेळा भेटी दिल्या. बाबासाहेब चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर २३ ऑक्टोबर १९२९ रोजी उतरल्यावर ते वसतिगृहात जाण्यासाठी टांग्यातून प्रवास करताना पुलावर त्यांचा टांगा उलटला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. बरेच दिवस ते आश्रम शाळेतील वसतिगृहात वास्तव्याने होते. याचदरम्यान त्यांचा सहवास अनेकांना लाभला. खासगी सचिव नानकचंद दत्तू यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुभव व आठवणी’ या ग्रंथात चाळीसगाव येथील सत्कार व टांग्यातून पडून झालेल्या अपघाताबद्दल लिहिले आहे.

सावदा येथील लोकल बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्या आग्रहाखातर बाबासाहेब पुन्हा १९४५ साली आनंदीबाई गंभीरराव विद्यालयाच्या भूमिपूजनासाठी चाळीसगावला आले होते. चाळीसगाव तालुका दलित फेडरेशनने बाबासाहेबांचा १९५१ साली भव्य – सत्कार समारंभ घडवून आणला. त्या दिवशी संपूर्ण चाळीसगावत कमालीचा उत्साह संचारला होता. कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे तितूर नदी लगतच्या पटांगणाकडे आगेकूच करीत होते. डोळ्यांत दर्शनाची विलक्षण आस होती. १५ नोव्हेंबर १९५१ ची गारठलेली सायंकाळ बाबासाहेबांच्या आगमनाने खूपच खुलून गेली होती. बरोबर रात्री ८ वा. सभामंचकावर बाबासाहेब येताच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट झाला. अन् काही क्षणातच बाबासाहेबांच्या जयजयकाराने चाळीसगाव दणाणून गेला. आजही हा हृदयस्पर्शी प्रसंग चाळीसगावकरांच्या हृदयपटलावर गारूड करून आहे. बाबासाहेबांची सभा राष्ट्रीय विद्यालय परिसरात मिल ग्राउंडवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी बाबासाहेबांना २००१ रुपयाची थैली अर्पण करण्यात आली. सभेदरम्यान देणगीची थैली अचानक गायब झाल्याने एकच धांदल उडाली होती. थैलीचा शोध घेण्यात आला. मात्र पैसे असणारी थैली शेवटपर्यंत सापडलीच नाही.

अस्थिकलशावर बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख आहे.

‘बहिष्कृत भारत’ या साप्ताहिकात सभा, सत्कार, अनुभव तसेच दीनबंधू आंबेडकर आश्रमाबाबत बाबासाहेबांनी लिखाण केले आहे. चाळीसगावातील श्यामराव कामाजी जाधव या तरुणावर बाबासाहेबांचा लोभ होता. ते त्याला नावानिशी ओळखायचे, अशीही आठवण सांगितली जाते. बाबासाहेबांना अतीव प्रेमापोटी अरे कारे करणारा कामाजी बहुतेक एकमेव सहकारी असावा. कामाजींनी बाबासाहेबांना स्वतःच्या घरी खापरावरच्या पुरणपोळीच्या पाहुणचारासाठी आमंत्रित केले होते. खापरावरच्या पुरणपोळ्या पाहण्याची बाबासाहेबांची ही पहिलीच वेळ होती. खापरावरच्या पोळ्या तयार कशा करतात हे पाहण्याची त्यांनी इच्छा जाहीर केली. भली मोठी पुरणपोळी पाहिल्यानंतर बाबासाहेबांनी कामाजीला पुरणपोळी अंगावर अंथरण्याची विनंती केली. इतके अप्रूप त्यांना खापराच्या पोळीचे वाटले. जेवणानंतर बाबासाहेबांनी डबाभर पुरणपोळ्या मुंबईला नेल्या होत्या.

डॉ. बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचे अतुल्य मानवतावादी विचार अखंड तेवत राहावे या पवित्र ध्येयाने पुलकित होऊन निष्ठावान अनुयायांनी त्यांचे देशभर पुतळे, स्मारके अन् अस्थिकलश जतन केले. ‘बाबासाहेब’ असे एकमेव महामानव आहेत ज्यांचे भारतात सर्वाधिक पुतळे दिमाखाने उभे आहेत. ज्यातून आजही प्रेरणा आणि स्फूर्तीचा निर्मळ झरा प्रवाहित होत आहे. चाळीसगावात तितूर नदीच्या किनारी १४ एप्रिल १९६१ रोजी बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण मध्य – भारत रेल्वे कामगार व समाज कल्याण मंडळाचे तत्कालीन सल्लागार डी.जी. जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री सोनुसिंह पाटील होते. नगराध्यक्ष रामगोपाल दुबेही उपस्थित होते. त्यावेळी पुतळ्याच्या पायथ्याशी बाबासाहेबांच्या अस्थी श्रद्धापूर्वक जड अंतःकरणाने जमिनीखाली पुरण्यात आल्या. गेल्या काही महिन्यापासून या परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभिकरणाचे काम जोमाने सुरू आहे. २२ जुलै २०२१ रोजी दुपारच्या सुमारास खोदकाम सुरू असताना या ठिकाणी साधारणतः दहा फूट जमिनीखाली बाबासाहेबांचे दोन अस्थिकलश सापडले. एका अस्थिकलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ (सायगाव) तर दुसऱ्या कलशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव (१९६०) असा उल्लेख आहे. ही सुवार्ता वायूवेगाने शहरात पसरताच अस्थिकलशाच्या दर्शनासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. ६० वर्षानंतर बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घडल्यामुळे त्या दिवशी अनुयायी वर्गात प्रचंड उत्साह संचारला होता.

भीमरायाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी आरोग्य सभापती सायली जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, धर्मभूषण बागूल, रमेश चव्हाण, अरुण अहिरे, रोशन जाधव, गौतम जाधव, बबलू जाधव आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

पालिकेच्या उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे, मुख्य अभियंता विजय पाटील यांनी पंचनामा केला. नव्याने उभारण्यात येणाऱ्या चबुतऱ्याखाली बाबासाहेबांच्या अस्थिकलशाची विधिवत पुर्नस्थापना लवकरच केली जाणार आहे. ही निश्चितच चाळीसगावासह समस्त आंबेडकरी अनुयायांसाठी गौरवाची अन् अभिमानाची बाब म्हणावी लागेल. सुशोभिकरणासाठी एक कोटी १५ लाख तर चबुतऱ्यासाठी २६ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. अस्थिकलशाच्या निमित्ताने महामानवाच्या गतकालीन हृदयस्पर्शी आठवणींनाही एक प्रकारे उजाळा मिळाला एवढे मात्र निश्चित.

– मिलिंद मानकर, नागपूर 
(मो. 8080335096)