पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंनी सोडले भाजपावर टीकास्त्र

जालना: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे. पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?, अशा शब्दात नाना पटोले यांनी जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. तसेच जनता भाजपला घरी पाठवण्याचाच आशीर्वाद देईल, असे मत  पटोले यांनी व्यक्त केले आहे.

आज जालन्यात असताना नाना पाटोळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हि टीका केली आहे. महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न आणखी वाढवायचे आहेत म्हणून की पेट्रोलची डबल सेंच्युरी करायची म्हणून जन आशीर्वाद यात्रा सुरू केलीय का?, असा सवाल करत जनता आता भाजपला घरी पाठवण्याचा आशीर्वाद देईल अशी खोचक टीका पटोले यांनी केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना आरक्षण मुद्यावरून हार आणि फेटे न घालण्याचा संदर्भ घेऊन देखील टोमणा मारला.

दुसऱ्याच्या घरात झाकून बघण्याचे काम काँग्रेसचे नसून ते भाजपचे काम आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांचीच प्रायव्हेसी संपवून हेरगिरीचे काम केल्याचा आरोप करत अशा विक्षिप्त मानसिकतेच्या लोकांनी देशाच्या राजकारणात येऊन देशाचा सत्यानाश केला आहे असा आरोप देखील त्यांनी केला.

कुणाची जण आशीर्वाद कधी होणार?

भाजपचे चारही केंद्रीय मंत्र्यांपैकी तीन केंद्रीय मंत्र्याची राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे.  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची यात्रा 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राणेंची 7 दिवस यात्रा होणार आहे. एकूण 170 हून अधिक भागांना राणे भेट देणार आहेत. मुंबई व कोकण भागात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. 

डॉ. भागवत कराड हे 6 दिवसाच्या यात्रेत 623 किमी प्रवास करणार आहेत. ते 155 भागांमधून फिरणार आहेत. यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद पांगारकर काम पाहणार आहेत. डॉ. भारती पवार या 6 दिवसात 421 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्या जवळजवळ 121 भागांना भेट देणार आहेत. त्यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रा. अशोक उईके आणि सहप्रमुख म्हणून हरिश्चंद्र भोये व यात्रा प्रभारी म्हणून किशोर काळकर काम पाहणार आहेत.