म्हाडा परीक्षेच्या तारखेत बदल, जितेंद्र आव्हाडांनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

मुंबई/प्रतिनिधी

राज्यात आरोग्य भरती परीक्षा आणि टीईटी परीक्षेचा (TET Exam) पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर ऐन परीक्षेच्या आदल्या रात्रीच म्हाडा भरती परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर म्हाडाची परीक्षा रातोरात रद्द करुन पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने क्लस्ट 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखन या संवर्गाकरीता 29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा (Online Exam) होणार होती. मात्र ही परीक्षा (MHADA Exam) पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख ही म्हाडा विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, म्हाडाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. पण एका तारखेत बदल करावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक परीक्षा रद्द केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि म्हाडाच्या प्राधिकरणाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. खरंतर एमपीएससीने तपासायला पाहिजे होते. कुठल्या विभागाने कुठल्या ठिकाणी परीक्षा जाहीर केली आहे. त्यामुळे यावर वाद न घालता. एका दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. तसेच, म्हाडा परीक्षा पुढे ढकलेली नाही, पण राज्यभरातून जे विद्यार्थी येणार होते, त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.

29 जानेवारी 2022 रोजी PSI या पदाची मुख्य परीक्षा आहे आणि त्याच दिवशी म्हाडाचे सुद्धा पेपर सुरु होणार आहेत.
यामुळे बरेच मुले परीक्षेस मुकण्याची शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
ती विनंती आता राज्याचे गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मान्य करत परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.