सामान्य महिला ते संगीत क्षेत्रातील वरिष्ठ प्राध्यापक असा प्रवास…. प्रा.दिपाली पांडे

यंग महाराष्ट्र प्रतिनिधी/वैभव आदोडे

भारतीय संविधानाने महिलांना स्वातंत्र्य बहाल करून त्यांच्या जगण्याचा मार्ग खुला केला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसून येते परंतु ग्रामीण भागामध्ये आजही महिला बंधनात असून त्यांना ध्येयप्राप्तीच्या मार्गामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अशाच अडचणींना तोंड देत प्राध्यापक दीपाली देशपांडे यांनी आपलं आयुष्य सफल केला असून आजच्या महिलांपुढे त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कर्तुत्ववान आयुष्याची यशोगाथा आज आपण जाणून घेऊया.

हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव इथे त्यांचे कुटुंब राहायचं घरामध्ये आई वडील आजी-आजोबा आणि तीन भावंडे (दोन भाऊ एक बहीण) असा त्यांचा परिवार. वडील 1992 च्या काळात लाईट खात्यांमध्ये कार्यरत होते त्यामुळे घरची परिस्थिती मध्यमवर्गी होती. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पुसेगाव मध्येच पूर्ण केलं, त्यावेळी प्रसारमाध्यमांची खूप कमतरता होती ग्रामीण भाग असल्यामुळे लाईटच्या समस्या होत्या, टीव्ही होते पण लाईटच्या समस्येमुळे तेसुद्धा कधीतरी पहायला मिळायचे. आयुष्यात काहीतरी करायचंय असं काही निश्चित ध्येय नव्हतं पण आई-वडिलांच्या सतत सहवासात राहिल्यामुळे त्यांच्यात चांगले संस्कार रुजत गेले परिस्थिती कशीही असो आपण तिला तोंड दिले पाहिजे अशा गोष्टी त्यांच्या मनात रुजत गेल्या वडील जेव्हा आपल्या मुलांसाठी वही, पेन, पुस्तक घरी आणायचे तेव्हा शेजारी असलेले एक गरीब कुटुंब ज्या कुटुंबात पाच मुली होत्या त्या मुलींनाही आपल्याच मुली समजून शैक्षणिक साहित्य पुरवायचे यामधूनच दीपालीच्या मनावर एकमेकांना मदत करण्याची स्नेहभावाची वृत्ती रूजत गेली.

पुढे वडिलांची बदली नांदेड मधल्या एका छोट्याशा गावात झाली आणि आपल्या मुलीला दहावीनंतर शिक्षणासाठी कुठे ठेवायचं? असा प्रश्न वडिलांसमोर उभा राहिला. दिपालीहून लहान असलेला भाऊ आठवी पास झाला होता आणि दिपाली दहावी उत्तीर्ण झाली होती. त्या दोघांनाही नांदेडमध्ये ते श्रीनगर येथे दीपालीच्या मावशी जवळ वडिलांनी एक रूम करून दिली आणि दीपालीने प्रतिभा निकेतन महाविद्यालय येथे इयत्ता 11वी (कला) ला प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून आल्यामुळे नांदेड सारख्या शहरी परिसरात दीपालीला रूळण्यासाठी बराचसा कालावधी लागला. घरचं वातावरण अतिशय सुसंस्कृत असल्याकारणाने ती बाहेरच्या कुठल्याही आकर्षणात अडकली नाही. तिच्या कॉलेज पासून घरापर्यंतचं अंतर साधारणपणे दोन ते अडीच किलोमीटर होतं बऱ्याच वेळा आर्थिक अडचणीमुळे ती कॉलेजला पायी चालत जायची. एके दिवशी नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली आणि वर्गात आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसली वर्गात सर आले आणि सरांचं अचानकपणे तिच्याकडे लक्ष गेलं त्यांनी तिला उठवलं आणि विचारलं,’तू श्रीनगरला राहतेस का?’दिपाली म्हणाली, ‘हो सर’.

मी तुला बऱ्याचवेळा कॉलेजला पायी चालत येताना पाहिलंय म्हणून विचारतोय,’बरं तू पायी का चालत येतेस?’दीपालीने आपली अडचण सरांना सांगितली तेव्हा सर म्हणाले,’ते काही नाही तू उद्यापासून माझ्यासोबत माझ्या स्कुटीवर यायचं कॉलेजला. ‘सरांचे हे बोल ऐकून दिपालीचं मन भरून आलं, त्या सरांचं नाव मकरंद जोशी असं होतं. दिपाली रोज कॉलेजला जाऊ लागली, आणि सन 1999 ला बारावीत ती 79 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली. दिपालीचं हे घवघवीत यश पाहून घरच्यांना खूप आनंद झाला.

त्यानंतर पुढील पदवी शिक्षणासाठी दीपालीने यशवंत कॉलेज नांदेड येथे हे बीए प्रथम वर्षात प्रवेश घेतला. घरामध्ये पूर्वीपासूनच संगीताचा मोठा वारसा होता. वडील उत्तम तबलावादक होते त्यामुळे कळत नकळत दिपाली च्या मनात संगीताप्रती प्रेम व आवड निर्माण झाली होती. संगीताचा रियाज चांगला व्हावा यासाठी दिपाली शेजारीच राहत असलेल्या सिताभाभी यांच्याकडे गायन क्लास शिकण्यासाठी जाऊ लागली त्यांच्या क्लासची फी त्यावेळी दरमहा 300 रुपये एवढी होती पण दिपालीकडून त्यांनी एकही रुपये न घेता तिला संगीतविद्या मोफत शिकवली. त्या शिस्तीने अतिशय कडक स्वभावाच्या होत्या.

दीपालीच्या आयुष्यामध्ये जे जे व्यक्ती आले त्या सर्वांचा कुठे ना कुठे दीपालीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. दीपालीला नेहमी वाटायचं आज आपण कुणाची तरी मदत घेतोय उद्या आपण कुणाला तरी मदत करायची.बीए तृतीय वर्षात आल्यानंतर तिचा संपूर्ण परिवार नांदेडला राहायला. आई-वडिलांना आता तिच्या लग्नाची काळजी लागली तिच्यासाठी वेगवेगळी स्थळे बघणं चालू झालं. बघता बघता तिचं पदवीचे शिक्षण ही पूर्ण झालं. पुढील दोन वर्षाच्या कालावधीत तिने अमरावती विद्यापीठातून एमए ची पदवी संपादित केली. आणि आई वडिलांनी तिचा एका चांगल्या कुटुंबातील मुलाशी विवाह लावून दिला. तिने एके दिवशी आपल्या पतीकडे NET चा फॉर्म भरण्याची मागणी केली, पती म्हणाला,’तुझा अभ्यास होत असेल तर भर माझी काहीच अडचण नाही’. आणि पतीच्या सहमतीने तिने तो फॉर्म भरला. दरम्यानच्या काळात ती गर्भवती राहिली होती. आपला पती हा खाजगी क्षेत्रात वकिली करत असून त्याचा पगार आपल्या संसाराला पुरेसा नाही हे तिच्या लक्षात येताच तिने घरीच विद्यार्थ्यांचा गायन क्लास घ्यायला सुरुवात केली. हे सगळं ती गर्भवती अवस्थेत असताना करायची ही विशेष बाब होती. ज्या दिवशी तिला मुलगा झाला तो दिवस होता लक्ष्मी स्थापनेचा (गौरी स्थापना) अशा शुभमुहूर्त दिनी घरात सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंदाचं हास्य होतं आणि त्याचवेळी घरी एक पोस्ट आला आणि कसलंतरी बंदिस्त पत्र देऊन गेला. तिच्या पतीने ते पत्र खोलून पाहिले तर त्यामध्ये दीपालीचा NET च्या परीक्षेचा निकाल आला होता. ही गोड बातमी ऐकून दीपालीचा आनंद द्विगुणित झाला.

पुढे ती वेगवेगळ्या संस्थेला मुलाखत देण्यासाठी जाऊ लागली. एके दिवशी घरांमध्ये कुठल्यातरी सणानिमित्त दिपाली आपल्या सासुसोबत करंज्या करत होती करंज्या ठेवण्यासाठी तिने एक पेपर घेतला तो पेपर आदल्या दिवशी चा होता आणि त्यात राणीसावरगाव च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाची जाहिरात होती ती जाहिरात वाचून दिपाली सासूबाईंना म्हणाली,’मुलाखतीची तारीख आजचीच चाहे’. तेवढ्यात सासुबाई म्हणाल्या,’मग विचार कसला करतेस, हो तयार लवकर आणि जा’. मुलाखतीचे ठिकाण परभणीला होतं त्या ठिकाणी ती पोहोचली त्यावेळी मुलाखत घेण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणार होते. ती त्या मुलाखतीत उत्तीर्ण झाली व राणीसावरगाव येथील महाविद्यालयात तिची प्राध्यापक पदी नियुक्ती झाली. तिने तिचं कुटुंब राणीसावरगाव येथे आणलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात यशस्वी झाली.

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाविद्यालयात दीपाली देशपांडे या संगीत विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत तसेच त्या संगीत विभागाच्या विभागप्रमुख पदाचा सुद्धा कार्यभार सांभाळतात. एक सामान्य कुटुंबातील महिला म्हणून त्यांनी आज पर्यंत ज्या ज्या परिस्थितींना तोंड दिलं, अशी वेळ आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर येऊ नये यासाठी त्या सतत कर्तव्यदक्ष राहतात. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तर कधी मानसिक मनोबल वाढवून विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीवर कशी मात करावी यासाठी प्रेरणा देतात खास करून ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यांना वेळोवेळी प्रेरित करतात. त्यांनी समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून आजच्या पिढीतील मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे मुलींनी परिस्थितीसमोर गुडघे न टेकवता परिस्थितीचा सामना करावा आणि आपले ध्येय गाठावे अशी त्यांची शिकवण आहे.