शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं आता काही खरं नाही; होऊ शकतो ‘इतक्या’ वर्षांचा तुरुंगवास

मुंबई | अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर आता अनेक धक्कादायक गौप्यस्फोट समोर येऊ लागले आहेत. यापूर्वी याच प्रकरणात अभिनेत्री गेहना वशिष्टला अटक झाली होती, आता राज कुंद्राच्या अटकेनं सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

इंटरनेटचा वापर भारतात वाढू लागला तसं पोर्नोग्राफी कन्टेंट बनवण्याचं प्रमाण वाढू लागलं. थ्रीजी फोरजी आल्यानंतर या उद्योगानं चांगलीच उचल खाल्ली. वेगवेगळ्या अपच्या माध्यमातून अशा फिल्म पाहण्याला उत्तेजन दिलं जात आहे, अशाच एका प्रकरणात राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर यासंदर्भात काय कायदे-कानून आहेत आणि दोषी आढळल्यास राज कुंद्राला काय शिक्षा होणार? याची चर्चा सुरु झाली आहे.

राज कुंद्राला काय शिक्षा होणार?-

पोर्नोग्राफी तसेच पोर्नोग्राफीक साम्रगी संदर्भात भारतात अत्यंत कडक कायदे आहेत. अशा गुन्ह्यांना भारतीय दंड संहितेसोबतच माहिती तंत्रज्ञान कायद्याचीही कलमं लावली जातात. भारतात इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर आयटी अॅक्टचा समावेश झाला असून इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणं हा या मागचा मोठा उद्देश आहे.

राज कुंद्रावर आरोप असलेलं कृत्य देखील आयटी अॅक्टअंतर्गत येतं, त्यामुळे इथं आयटी अॅक्टची कलमंही लावली जातील. आयटी अॅक्ट कलम 67A सोबत IPCच्या कलम 292, 293, 294, 500, 506, 509 अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास पाच वर्षांची शिक्षा किंवा 10 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.