शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १००व्या वर्षात पदार्पण; पायावर डोकं वर ठेऊन राज ठाकरेंनी आशीर्वाद घेतला

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे याचा आज वाढदिवस आहे. आज ते शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला.

पुरंदरे- ठाकरे कुटुंबांचं नातं अगदी जुनं आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अनेक व्याख्यानांना बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहायचे. त्यांच्यासोबत ते राज ठाकरेंना देखील घेऊन जायचे. बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या पुणे-मुंबईत भेटी व्हायच्या त्यावेळेस देखील राज ठाकरे त्यांच्या सोबत असायचे. एकंदरित बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांचं जिवाहल्याचं नातं आहे.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असले की वेळ काढून ते आवर्जून बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतात. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाला होता त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी पुरंदरेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आजही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांनी बाबासाहेबांना शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले.