सुनेत्रा पवार : दीपज्योती एक प्रकाश पर्व

नवरात्री विशेष

सुनेत्रा पवार म्हणजे समाजकारणातील एक मोठं नाव… बारामतीत माऊली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या प्रयत्नातून काटेवाडी गावाचा कायापालटच केला. भारतात पहिल्यांदा ‘ काटेवाडी’ गाव त्यांनी ‘इको-फ्रेंडली व्हिलेज’ म्हणून नावारूपास आणले शिवाय गावाला ‘निर्मलग्राम पुरस्कार’ देखील मिळाला. ‘उद्योगशीलता’ आणि विनयशीलता याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुनेत्रा पवार. ‘शाश्वत विकास’ या संकल्पनेवर भर देणाऱ्या सुनेत्रा पवार यांचे मूळ गाव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील संत गोरा कुंभार यांची पार्श्वभूमी असणारे ‘तेर’ हे होय. तेर या गावात वाढलेल्या सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच घरच्या वातावरणामुळे समाजकारण आणि शेती याविषयीचं बाळकडू मिळालं आहे. सुनेत्रा पवार या त्यांच्या घरात सर्वात धाकट्या पण वयाच्या मानाने त्या तशा फार समंजस होत्या. त्यांचे शालेय शिक्षण हे तेर या गावात तर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील महाविद्यालयात झाले आहे.

महाविद्यालयीन जीवनात त्यांनी वसतीगृहाचा अनुभव घेतला आहे. महाविद्यालयात शिकत असतानाच सुनेत्रा पवार यांच्यातले नेतृत्व गुण हे दिसून येत होते. याच नेतृत्वगुणांचा उपयोग त्यांनी त्यांच्या पुढच्या समाजकार्यात केल्याचं आपल्याला दिसून येते. सुनेत्रा पवार यांचा स्वभाव शांत, संयमी आणि प्रेमळ आहे. त्यांचे नाव सुनेत्रा या नावाप्रमाणेच त्यांच्या डोळ्यातून मायेचा ओलावा दिसून येतो.सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या माहेरचा वसा आणि सासरचा वारसा दोन्हीही जपला आहे.

अगदी ग्रामीण भागापासून ते पर्यावरण संबंधी आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रतिनिधित्व असा त्यांचा एकूण प्रवास आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगारांच्या संधी मधली तफावत ओळखून सुनेत्रा पवार यांनी रुरल वर्ड एनव्हायरमेंटल फॉर्मद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच बारामती टेक्स्टाईल पार्क द्वारे तीन हजाराहून अधिक ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे विकसनशील देशाचे जर विकसित राष्ट्रात रुपांतर करायचे असेल तर ग्रामीण भागाच्या विकासावर भर दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे. रुरल वर्ल्ड एनव्हायरमेंटल फोरमच्या ‘थिंक टँक मेंबर’ म्हणून त्यांनी काम केले आहे.

अनेक विकास कामांत त्यांचा पुढाकार एनव्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापिका आहेत.एनव्हायरमेंटल फोरमच्या स्थापनेचा उद्देश, लोकांना पर्यावरण शिक्षण देणे पर्यावरण विषयक जनजागृती करणे आणि शाश्वत विकासासंबंधी माहिती देणे हा आहे यावरून सुनेत्रा पवार यांचा शाश्‍वत विकासाकडे असलेला कल दिसून येतो. सुरुवातीला बचत गटांच्या माध्यमातून समाजकार्य सुरु करणाऱ्या या सुनेत्रा पवारांनी महिला सक्षमीकरणावर नेहमीच भर दिला आहे. केवळ विकास कामांची आखणी करणे यावर त्यांचे काम थांबत नाही तर जनमानसात मिसळून त्या कामाला हातभार लावणे, मार्गदर्शन करणे अशी कामे सुनेत्रा पवार या करत असतात. लोकांसोबत आपुलकीने संवाद साधणे विकास कामांविषयी माहिती देणे त्यांचे महत्त्व पटवून देणे, तसेच लोकांच्या काही अडचणी असतील तर त्या वैयक्तिक पातळीवर समजावून घेणे त्या सोडविणे ही सुनेत्रा पवार यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. तसेच विकास कामे करत असताना पर्यावरणाचे भान असणे आवश्यक असते.

‘इको फ्रेंडली व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून देशभरात या संकल्पनेची ओळख त्यांनी करून दिली. सुनेत्रा पवार, ‘सुनेत्रा’ या नावाप्रमाणेच त्यांच्या डोळ्यात मायेचा ओलावा दिसून येतो. तसेच शाश्वत विकासाचे त्यांचे धोरण पाहून एकूणच विकास आणि पर्यावरण यासंबंधीची त्यांची दूरदृष्टी दिसून येते तर अशा या सुनेत्रा पवार यांच्या कर्तृत्वाला यंग महाराष्ट्राचा सलाम..!!!