निर्भिड पत्रकारितेचा आदर्श : रेश्मा शिवडेकर

यंग महाराष्ट्र प्रतिनिधी/रेणू भोसले

पत्रकारिता हे तसं खूप आव्हानात्मक क्षेत्र…आणि मराठी पत्रकारितेला तर दर्पण,मूकनायक,केसरी, मराठा अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. आणि जिथे अशी परंपरा येते तिथे ती टिकवण्याची जबाबदारीही…लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या या क्षेत्रात आजवर अनेकांनी आपला वेगळा ठसा उमटवला. सध्या मुद्रीत माध्यमांपासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास सोशल मिडीयापर्यंत येऊन थांबला आहे. तरी ‘प्रिंट मीडिया’ टिकून आहे तो चोखंदळ वाचकांमुळे आणि विश्वासार्हता हा या माध्यमाचा आत्मा आहे.

रेश्मा शिवडेकर हे अशा एका मुद्रीत माध्यमातलं नाव. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीच्या ब्युरो चीफ म्हणून त्या कार्यरत आहेत. ही जबाबदारी त्या गेली चार वर्षे हाताळत आहेत. वृत्तपत्र वाचनाची आवड अगदी शालेय जीवनापासूनच असणाऱ्या रेश्मा यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या बातमीदारीतून वेगळा ठसा उमटवला. लक्षवेधी बातमीदारीकरिता त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘रामनाथ गोएंका पुरस्कार’ तसेच ‘आचार्य अत्रे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रेश्मा शिवडेकर गेली २० वर्षे त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्या मंदिर, तर महाविद्यालयीन शिक्षण ‘कीर्ती कॉलेज’ मधून झाले. पुढे राज्यशास्त्र या विषयातून त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमए केले. त्यांचं पत्रकारितेचं शिक्षण पुणे विद्यापीठाच्या ‘ रानडे इन्स्टिट्यूट’ मधून झाले. पत्रकारितेत करिअर करण्याचा निश्चय तर होता, परंतु, रानडेमधील पोषक वातावरणामुळे ते अधिकच दृढ झाला. पत्रकारितेला पूरक अशी वाचनाचीही आवड होती. त्यातही बातमीदारीचे क्षेत्र त्यांना विशेष आवडे.
 
प्रश्न पडणे आणि त्यांचे उत्तर शोधणे हा बातमीदारीचा गाभा. त्यानंतर बातमीदाराला गवसलेले मोजक्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहोचविणे हा दुसरा टप्पा. या दोन्हीत हातोटी असल्याने रेश्मा यांचा पत्रकारितेतला प्रवास सोपा झाला. सुरवातीला राज्यशास्त्र या त्यांच्या विषयापुरते वाचन मर्यादीत होते. पण, पत्रकारितेत जम बसविण्यासाठी त्यांनी अवांतर वाचनदेखील वाढवले.

आजवर त्यांनी नवशक्ती, चित्रलेखा, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि त्यानंतर लोकसत्तासाठी काम केले आहे. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नवशक्तीतून कामाला सुरूवात केली. नवशक्तीच्या ‘परिसर’ या पुरवणीसाठी बातम्या जमा करणे आणि संपूर्ण पुरवणी लावून घेणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी हाताळली. त्यानंतर चित्रलेखा, सकाळ, मटा अशा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवानंतर त्या लोकसत्ताकरिता काम करू लागल्या. बातमीदारी त्या आधीही करत होत्या. पण, लोकसत्ताने करिअरला कलाटणी मिळाली. सध्याच्या काळात अत्यंत दुर्लभ असलेले बातमीदारीचे स्वातंत्र्य त्यांनी येथे अनुभवले. शिक्षण या विषयाशी संबंधित त्यांच्या अनेक बातम्या गाजल्या. एका बातमीदाराला आणखी काय हवे असते… पुढे लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीच्या ब्युरो प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. संपादक गिरीश कुबेर यांनी दाखविलेला विश्वास त्यांनी आतापर्यंत सार्थ ठरवला आहे. आतापर्यंत शिक्षण, रिअल इस्टेट, कोर्ट अशा क्षेत्रात केलेल्या बातमीदारीचा अनुभव या कामात त्यांना उपयोगी ठरतो आहे.

 मराठी पत्रकारितेने बातमीदारीचा बाज बदलावा अशी गरज रेश्मा व्यक्त करतात. त्यांच्या मते, “अलिकडे वाचन संस्कृतीतही सोशल मीडियाच्या प्रभावामुळे फास्ट फूड हा प्रकार आला आहे. कुठलाही आधार, संदर्भ नसलेल्या लिखाणात वाचकांची बरीचशी भूक भागते. केवळ ते फुकटात आणि सहज समोर येत असल्याने अशा लिखाणाकडे लोक आकर्षित होतात. पण अजुनही सकस, सर्वसमावेशक लेखनाची आवड जोपासणारा चोखंदळ मराठी वाचक आहे. मराठी पत्रकारिता ही याच वाचकांमुळे टिकून आहे.”

अर्थात हा वाचक दिवसेंदिवस आक्रसत असल्याने तो टिकवण्यासाठी मराठी पत्रकारितेला बातमीच्या थोडे पलीकडे जाऊन सर्वांगीण आणि सर्वसमावेशक माहिती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांना वाटते. थोडक्यात फक्त ‘न्यूज’ देण्यापेक्षा ‘न्यूज फीचर्स’ हा प्रकार आत्मसात करायला हवा. मूळ बातमीला माहिती आणि विश्लेषणाची जोड देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी फक्त बातमीकेंद्री पत्रकारिता करून भागणार नाही. बातमीदाराच्या मानसिकेतच बदल घडवून बातमीदारासोबतच ‘चांगले लेखक’ येत्या काळात घडवण्याची गरज आहे, असे त्या सांगतात.
 
हे चांगले लेखक कसे घडणार… व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल या सोयीसुविधांचा पत्रकारितेला जसा फायदा झाला तसे नुकसानही खूप झाले. या माध्यमांतून माहिती इतक्या वेगाने बातमीदारावर येऊन आदळत असते की बातमीचे विश्लेषण, पूरक माहिती, आकडेवारी हे मिळविण्यासाठी त्याचा दिवस अपुरा पडतो. खासकरून मराठी पत्रकारितेला जिथे मर्यादीत मनुष्यबळ आहे तिथे ही समस्या प्रकर्षाने जाणवते. म्हणूनच मराठी पत्रकारितेने आपला बाज बदलावा, असे रेश्मा सांगतात.

हे सुचविताना पत्रकार कसा असावा, याविषयीही रेश्मा नकळतपणे सांगून जातात. पत्रकारांनी भरभरून जगावं, असे त्यांना वाटते. अवांतर वाचनाबरोबरच नाटक, संगीत, पर्यटन, खेळ या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा त्यांनी समरसून आनंद घेतला पाहिजे. या सगळ्याचा पत्रकारितेला नकळत फायदा होत असतो, अशी त्यांची भावना आहे.

केवळ पत्रकारितेच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱया तरूणींनी मानसिक-भावनिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होण्याची गरज त्यांना वाटते. त्यासाठी विविध छंद, आवडीनिवडी जपाव्या. या जोडीला नियमित व्यायाम किंवा एखाद्या खेळाची आवड जोपासण्याचा सल्ला त्या देतात. आनंदी मन आणि सुदृढ शरीर यांचा आपली कामगिरी उंचावण्यासाठी निश्चितच फायदा होतो, यावर रेश्मा सांगतात.

रेश्मा यांच्या कारकिर्दीत त्यांच्या कुटुंबियांचाही खूप मोठा वाटा आहे. मिडडे या इंग्रजी वर्तमानपत्रात सिटी एडिटर असलेले त्यांचे पती संजीव यांचे पाठबळ त्यांच्यामागे नेहमीच राहिले. परंतु, सासुबाई शीतल यांचेही मोलाचे सहकार्य आणि पाठिंबा त्यांना मिळतो. पत्रकारिता हे क्षेत्र असे की एकदा सकाळी घरातून बाहेर पडले की घरी कधी परतू, याची खात्री नाही. अशा या क्षेत्रात घराची आणि आपल्या ११ वर्षांच्या मुलीची जबाबदारी खंबीरपणे सांभाळणाऱया सासुबाईंमुळेच २० वर्षे पत्रकारितेत उभे राहण्याचे बळ मिळाले, असे रेश्मा आवर्जुन सांगतात.